जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील प्रभात चौकातील परदेशी सोडा गाडीच्या दुकानाजवळ दुचाकी परत मागितल्याच्या कारणावरून एकाला काचेचा ग्लास मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दीपक बाबूलाल झंवर (वय-५३) रा. कासमवाडी, जळगाव हे दूध डेअरीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. सोमवार १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दीपक झंवर हे प्रभात चौकातील परदेशी सोडा गाडीच्या दुकानाजवळ दुचाकी घेण्यासाठी आले. त्याठिकाणी कुंदन चौधरी (पूर्ण नाव माहित नाही) रा. महाबळ, जळगाव हा त्या ठिकाणी आला. दीपक झंवर यांनी कुंदनकडे त्यांची दुचाकी मागितली. याचा राग आल्याने कुंदनने त्याच्या हातात असलेला काचेचा ग्लास दीपकच्या डोक्यावर मारून फेकला. दीपकला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरीकांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार घेतल्यांनतर मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी कुंदन चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.