मुंबई (वृत्तसंथा) – “ऊसतोड कामगारांसाठी सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं. माझ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत, आम्ही जर सर्व एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम होईल. सर्वांनी मिळून राजकीय पक्ष बाजूला ठेवून मनापासून हे करायला हवं. यासाठी पंकजा मुंडे किंवा रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत. आमचं काही म्हणणं नाही. कुणीही नेतृत्व करा पण पक्षाच्या पलीकडे जावून चांगल्या विचारांनी काम करुया,”, असं परखड मत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात मांडलं.
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात मंगळवारी (15 डिसेंबर) प्रदर्शित झालेल्या भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आले होते. या कार्यक्रमात खूप खेळीमेळीच वातावरण बघायला मिळालं. या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांची बाजू मांडणारं भावनिक पत्र सर्वांसमोर वाचून दाखवलं. या पत्रावर तीनही नेत्यांनी खूप मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली .
“पंकजा ताईंचा आणि आमचा जिल्हा मुळात ऊसतोड कामगारांचा उगम आहे. ऊसतोड कामगारांचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. त्यांच्याबरोबर माझे आजोबाही त्या प्रक्रियेत होते. खरंतर त्यांच्यामुळेच कामगारांच्या या अडचणीदेखील आहेत ते समोर आलं. रोहित पवार, पंकजा मुंडे यांनी देखील मत मांडलं. त्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केलं तर आमचा त्यांना पाठिंबा आहेच. कारण त्यांनी त्या गोष्टी फार जवळून आपल्या आहेत”, असं सुजय म्हणाले.
“आज आम्ही तरुण आहोत. आमच्या सर्वांचा कारखाना आहे. किंबहुना आम्ही जेवढे तरुन आमदार-खासदार असू ज्यांचे कारखाने आहेत, त्यांनी सर्वांनी म्हणजे मला तरी वाटतं एकत्र बसलं पाहिजे. प्रत्येकाने काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. फंड तयार करुन शिक्षणाची किंवा रुग्णालयाची जबाबदारी घेऊ शकतो का आपण यावर चर्चा व्हायला हवी”, अशी भूमिका सुजय विखे पाटील यांनी मांडली.
“उदारणार्थ नगर जिल्ह्यात बरेच साखरकारखानदार आहेत. समजा माझं 700 बेड्सचं रुग्णालय आहे. काम करत असताना ऊसतोड कागारांना कोणतीही इजा झाली तर हे रुग्णालय त्यांच्यावर मोफत उपचार करेल. त्यानंतर कारखाना नंतर पैसे देईल. त्यासाठी मी एक वर्ष थांबू शकतो. मला लगेच पैशांची आवश्यकता नाही. मी म्हणत नाही की, आपण फार काही बदल करु शकू पण पाच लोकांचं कुटुंब जरी घडवलं तर या पत्राला 5 टक्के उत्तर दिलं असं होईल, असं मला वाटतं”, असं सुजय विखे म्हणाले.
कामगारांचं अनेकवर्ष शोषण झालं, त्यांना न्याय मिळायला हवा : पंकजा मुंडे
“खूप भावूक पत्र होतं. ऊसतोड कामगारांचं मी प्रतिनिधित्व करते. कारण ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हेदेखील लढले. त्यांच्या प्रवासात त्यांच्या ज्या भाववाढी होत्या त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शदर पवार आणि गोपीनाथ मुंडे हे एकत्र बसून न्याय द्यायचे. मला असं वाटतं, प्रत्येक कामगारांचं ते ज्यावर जगतात त्या उद्योगाशी जे नातं असतं ते गाय-वासरु सारखं असलं पाहिजे. कारण गायीला जर पान्हा फुटला तर वासराचं पोट भरतं. तसं नात कामगाराचंही नातं असलं पाहिजे”, असं मत पंकजा मुंडे यांनी मांडलं.
“कामगारांचं अनेकवर्ष शोषण झालं. कामगारांना आता अधिकार कळायला लागले. हा असंघटीत कामगार आहे. या कामगाराला न्याय मिळायला हवा. त्यांच्या न्यायाच्या लढ्यात बऱ्याचदा राजकारण होतं. राजकारणामुळे त्यांना हवा तसा न्याय मिळत नाही. हे चित्र मला आता या टप्प्यात दिसलं. तरीही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जे करता येईल ते आपल्यापरीने आपण करु शकतो. ऊस हा कामगारांचा शत्रू नाही. ऊस हा कामगारांची शक्तीच आहे. पण ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीला ऊस तोडावा लागू नये हे मला जिवंतीपणी बघायचं आहे”, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी काम करावं लागेल : रोहित पवार
“फार भावनिक पत्र होतं. या पत्राच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली आहे. माझं व्यक्तीगत म्हणणं आहे, नव्या पिढीने हातात कोयता धरु नये. त्यासाठी शिक्षण, शिक्षणाबरोबर त्या त्या परिसरात व्यवसायाची आणि नोकरीची संधी द्यावी लागेल. महिलांची फार अडचण असते. फार कष्ट करावे लागतात. त्याचबरोबर लहान मुलं-मुलींना हवंतसं शिक्षण मिळत नाही. त्यामुळे एक पिढी सातत्याने शिक्षणापासून वंचित राहते”, असं रोहित पवार म्हणाले.
“आपल्याला शिक्षणावर काम करावं लागेल. नव्या पिढीला नोकरी कशी देता येईल? यासाठीदेखीस आपल्याला प्रयत्न करावे लागतील. जर त्या बाबतीत आपण कमी पडलो तर कदाचित नंतर कुठेतरी असं म्हणावं लागेल की, राजकारणात येऊन आम्ही काय केलं? अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्हा सर्वांना कोणाच्याही जीवणाचं राजकारण न करण्यासाठी अलिकडच्या काळात जे राजकारण बिघडलं ते थोडसं सुरळीत करावं लागेल. असं केलं तरच आपला महाराष्ट्र आणि देश विकासाच्या दिशेने जाईल”, असं रोहित पवार यांनी सांगितलं.