मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राऊत यांनी एका नामांकित वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळते’ असे विधान केले होते. आता राऊत यांच्या याच विधानावरून भाजप आक्रमक झाली असून, ‘राऊत यांचं हे विधान कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या डॉक्टरांचा अपमान आहे. त्यांनी माफी मागावी.’ अशी मागणी करण्यात आली आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी, ‘ जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे,’ असं विधान केलं होत.
आता राऊत यांच्या याच विधानावरून भाजपने त्यांना घेरलं आहे. याबाबत बोलताना भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी, ‘ कोरोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असे विधान करणे म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यातीलच नव्हे देशातील सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी केली आहे.