मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना काळापासून शीव येथील डीएस हायस्कूल पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहे. मात्र या शाळेत शिकणाऱया धारावीतील विद्यार्थ्यांना टॅब, स्मार्टफोनअभावी ऑनलाइन शिक्षण मिळत नव्हते. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या मदतीला या शाळेतीलच माजी विद्यार्थी धावून आले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी टॅब, स्मार्टफोनची मदत केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर धारावी, शीव कुर्ला परिसरातल्या गरजू कुटुंबांतील 60 विद्यार्थ्यांना स्मार्टफोन तसेच टॅब देण्यात आले.
शीव रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीकांत खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राज्य सरकारने शाळा ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील शाळा ऑनलाइन सुरू आहेत. मात्र राज्यातील सुमारे 60 टक्के कुटुंबांकडे आजही स्मार्टफोन नाहीत. डीएस हायस्कूल शाळेतील 35 टक्के विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षणासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. हे सर्व विद्यार्थी धारावी, प्रतीक्षा नगर, कुर्ला इथल्या कष्टकरी वस्त्यांमधील आहेत. पाच-सात हजारांचा स्मार्टफोन विकत घेणेही त्यांच्या पालकांना शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ऑनलाइन वर्गांपासून ते वंचित राहू नयेत यासाठी स्मार्ट मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब किंवा कॉम्प्युटर दान करा’ असे आवाहन शाळेने केले होते.
या आवाहनाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवडय़ात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 35 स्मार्टफोन, चार टॅब आणि दोन लॅपटॉप उपलब्ध झाले. तर, दुसऱया आठवडय़ात सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले शाळेचे माजी विद्यार्थी रोहित मांडगे यांनी 20 नवे कोरे टॅब शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवले आहेत. या मदतीमुळे शाळेतील 60 विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतःच्या हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे. शाळेला आणखी किमान 300 स्मार्टफोन किंवा टॅबची गरज आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.







