नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये ७४वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येतोय. यंदा कोरोना संकटामुळे सतंत्र्यदिनी आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आली आहे. असं असलं तरी प्रथेप्रमाणे याही स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये महिलांच्याआरोग्याच्या मुद्द्याचाही समावेश होता.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, ‘वर्तमान सरकार देशातील माता-भगिनींच्या आरोग्याची काळजी घेणार सरकार आहे. ६००० जनऔषधी केंद्रांमधून ५ कोटी महिलांना सॅनेटरी पॅड देण्यात आलं आहे.’ असं वक्तव्य केलं.
दरम्यान, देशामध्ये आजही महिलांच्या मासिक पाळीबाबत खुलेपणाने बोललं जात नसलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये उल्लेख केला. पंतप्रधानांच्या या कृतीमुळे त्यांचे समाज माध्यमांवर अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच याबाबत स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बोलणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरल्याचाही दावा देखील करण्यात येतोय.
याबाबत अभिनेता अक्षय कुमार याने देखील ट्विट केलं असून तो म्हणतो, ‘स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातपंतप्रधानांनी सॅनिटरी पॅडबाबत उल्लेख करणं खरी प्रगती आहे… यामुळे मासिक पाळी या मुद्द्याला महत्व प्राप्त होईल. ५ कोटी महिलांना एका रुपयांमध्ये सॅनेटरी पॅड उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे खूप-खूप धन्यवाद.’







