मुंबई ( प्रतिनिधी ) – काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून सुरू असलेलं राजकारण आता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. आता हे भोंगे हटवण्याची मागणी करण्यासाठी मनसेनं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच पत्र लिहिलं आहे.
या पत्रामध्ये राज्य सरकारला हे भोंगे हटवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यासोबतच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारी भूमिका घेतल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. मनसेच्या नाशिक विभागाकडून हे पत्र अमित शाह यांना पाठवण्यात आलं आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकालात मशिदींवरील भोंग्यांमधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत असून प्रत्येक भारतीयास घटनेने कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत असून मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
“राज ठाकरेंनी दिलेल्या ३ मेपर्यंतच्या मुदतीस अकारण धार्मिक रंग देत विविध पक्षातील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य करण्यात येत आहेत. राज्यातील गृहमंत्री या संवैधानिक पदावर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येणार नसल्याचं वक्तव्य करत राज्यातील पोलीस सज्ज असल्याचा दिलेला इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्पष्ट उल्लंघन आहे”, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
“मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत आता केंद्र सरकारनंच पुढाकार घेत भोंगे तात्काळ उतरवण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावं”, अशी मागणी या पत्रातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करण्यात आली आहे.