मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील देशी दारू, बिअरबार चालकाच्या नुकसानीची शरद पवार यांना काळजी लागली आहे. त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत, मात्र या जाणत्या राजाने शेतकऱ्यांच्या अश्रूकडे, कष्टकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष देण्याची गरज होती. शेती उद्ध्वस्त झाली आहे, शेतमाल कुजून जातो आहे. अशावेळी शेतक-यांना या संकाटातून बाहेर काढण्यासाठी या खरीप हंगामात त्यांना गाजा पिकवायला परवानगी द्यावी. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहून परवानगी मागावी, अशी खोचक मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शरद पवार यांचे पत्र वाचून मला एकच प्याला नाटकाची आठवण झाली. त्यातील नायक सुधाकर याला त्या एकाच प्यालात गरिबांच्या झोपड्या अनेकांचे श्रम, दीनदलितांच्या व्यथा सामावल्यासारख्या वाटत होत्या. पवारसाहेबांचे तसेच झाले असावे. राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. फळे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. बाजारपेठ बंद आहे. कांदा अडचणीत आहे. गारपीट, अवकाळीच्या भरपाईची चर्चाही नाही. नाश्वत शेतमालाचे नियोजन सरकारने करायला हवे होते. तसे झाले नाही. जिल्हानिहाय धोरण वेगळे आहे.
राज्यात कुठेही एकवाक्यता नाही, अशा स्थितीत खरीप हंगाम तोंडावर आला आहे. खते आणि बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज लागेल. मागची थकबाकी असताना ते कसे मिळणार ? त्याबाबत धोरण नाही. त्यामुळे जाणत्या राजाने शेतकऱ्यांना दारूकाय अन गाजा काय ? दोन्ही नशा. त्यामुळे चिंता नसावी. खरे तर शेतकऱ्यांनी दारु तयार केली असती. मात्र पवार यांच्या यांनी एवढ्या भड्या उभ्या केल्या आहेत की आम्हाला हातभट्टी उभा करायलाही जागा नाही. असा टोलाही आ. सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना लगावला.