नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण आता कोरोनावर रामबाण ठरणारे औषध बाजारात येत आहे.
‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलप्मेंट ऑर्गनायझेशन’ने (DRDO) बनविलेले औषध 2 डीऑक्सी-डी ग्लूकोज (2-डीजी) चा (DRDO’s 2-DG drug) पहिल्या 10,000 डोसची पहिली बॅच पुढील आठवड्यात लाँच केली जाणार आहे. हे औषध 11-12 मे रोजी बाजारात आणले जाणार आहे, अशी घोषणा ‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांनी यापूर्वी केली होती. आता नव्या तारखेची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत.
डॉ. रेड्डीज लॅब आणि DRDO च्या माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या या औषधाला औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे. या औषधाच्या डोसनंतर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला 2-3 दिवसांत ऑक्सिजन सपोर्टवरून काढता येईल. ते लवकरच बरे होतील, असे त्यांनी सांगितले होते.
2-DG प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी
DRDO च्या वैज्ञानिकांनुसार 2-DG कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनविरोधात लढण्यास सक्षम आहेत. हे औषध कोरोना व्हायरसच्या प्रोटिनऐवजी मानवाच्या शरीरातील पेशींच्या प्रोटिनमध्ये बदल करते. यामुळे हा व्हायरस पेशींमध्ये राहू शकत नाही. तर अन्य औषधे, लसी या व्हायरसच्या प्रोटीनवर हल्ला करतात. जेव्हा व्हायरसचे म्युटेशन होते, तेव्हा अनेक औषधे परिणामकारक ठरत नाही.