नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. पण शनिवारी (दि. 15) पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावली असून त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे. सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
गेल्या महिन्यात खासदार सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर 10 मे रोजी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घऱी सोडण्यात येणार होते. पण अचानक खासदार सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे.
त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. सातव हे कॉंग्रेस नेेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. गेल्या वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी सातव यांची निवड झाली. 2014 साली सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.