वर्धा (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या विषाणूने आधीच लोकांचं जीवन विस्कळीत केलं असतानाच म्युकर मायकोसिस अर्थात बुरशीजन्य आजाराची नवी भर पडली आहे. काही दिवसापासून दैनंदिन म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने वर्ध्यामध्ये म्युकर मायकोसिस या आजारावरील इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. या संकटातून एक मार्ग निघाला आहे.
महाराष्ट्र, गुजरात बरोबर अनेक राज्यांमध्ये आताच्या काळात म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तर वर्ध्यामधील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी (Genetic Life Sciences Company) म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन बनवण्यात येणार आहे. तर या कंपनीला राज्याच्या FDA ने परवानगी देखील दिली आहे. तसेच आगामी १५ दिवसामध्ये कंपनी मायकोसिसवरील इंजेक्शनचे उत्पादन सुरू करणार आहे. कार्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोलाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून अनेक शहरांमध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण सापडत आहेत. यावरून नितीन गडकरींच्या कार्यालयाने म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या निर्मितीबाबत ट्विटरच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिलीय. एम्फोटेरीसीन बी चे एक इंजेक्शन सात हजार रुपयांना मिळते. तर एका बाधित रुग्णांना ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. म्हणून लोकांना ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. या दरम्यान वर्ध्यामध्ये तयार होणारं इंजेक्शन १२०० रुपयां मध्ये मिळणार आहे. तसेच, एका दिवसामध्ये २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार असल्याचं नितीन गडकरींच्या कार्यालयाकडून ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.