नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेत सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी मास्क उतरवले आहेत. सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन अर्थात CDC च्या सूचनेनंतर अमेरिकेने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र अमेरिकेप्रमाणे सध्या भारतातील वातावरण तसं नाही. त्यामुळे भारतात जरी दोन्ही डोस घेतले असतील,तरी मास्क लावणं आवश्यक असल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही भारतात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे, असं डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं नवं रुप समोर येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यामुळे जसं अमेरिकेत मास्क उतरवला आहे, तसं भारतात अजिबात करु नका, असं गुलेरिया यांनी म्हटलं. भारतात लसीकरणाने जोर धरला असला, तरी कोरोनाच्या नव्या अवतारात लस कितपत सुरक्षा देते हे अद्याप अनिश्चित आहे.
अमेरिकेतील संसर्ग रोग नियंत्रण आणि प्रतिबंध अर्थात CDC ने दोन लसीनंतर मास्कची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही आपला मास्क उतरवला होता. अमेरिकेत कोरोनाबाबत नवी नियमावली आल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात मास्क उतरवला.
लसीकरणामुळे अमेरिकत कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्याशिवाय अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स लेबर युनियननेही येत्या काळात शाळा सुरु करण्याची शिफारस केली आहे. 12 ते 15 वर्षांच्या मुलांना फायजर लस देण्यास मंजुरी मिळाल्याने, ही शिफारस करण्यात आली आहे.
अमेरिकेत जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि कोरोना मृतांची संख्या नोंदली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भारतात अशी घोषणा करणं हे घाईगडबडीचं ठरेल, असं गुलेरिया म्हणाले. आपल्याला सद्यस्थितीत सतर्कता बाळगावीच लागेल. जोपर्यंत आपण पूर्ण नियंत्रण मिळवत नाही, जोपर्यंत याबाबतचे सर्व आकडे, सर्व डेटा समोर येत नाही, तोपर्यंत आपण कोरोना नियमावली पाळावीच लागेल, असं गुलेरियांनी सांगितलं. हा व्हायरस सतत म्युटेट होत आहे, त्याचे नवे अवतार समोर येत आहेत. त्यामुळे सध्या आम्ही हे सांगू शकत नाही की या व्हायरसवर वॅक्सिन किती प्रभावी ठरेल, असंही ते म्हणाले.