कोल्हापूर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत, विचारवंत यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावं. शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे ४ जूनला जेष्ठ साहित्यीक व प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली “नांगरट साहित्य संमेलन” होणार आहे. या संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
एक दिवशीय संमेलनाला उत्सवी स्वरूप न देता शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी. या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी या संमेलनामध्ये ठोस उपाययोजना पुढे याव्यात.शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर साहित्यिकांनी लिहावं. त्यांनी मार्गदर्शन करावं. यासाठी हे संमेलन तीन सत्रात होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रामध्ये संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष राजू शेट्टी, निमंत्रक कवी संदीप जगताप व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ हे मनोगत व्यक्त करतील.
दुसऱ्या सत्रामध्ये शेतकरी प्रश्नांचे साहित्य,कला,माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावरचा परिसंवाद जेष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या परिसंवादामध्ये प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे, प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख, चित्रपट निर्माते प्रवीण तरडे, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा.जालंदर पाटील हे मान्यवर सहभागी होतील. तिसरे सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवी संमेलन संपन्न होईल. या कवी संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कवी विजय चोरमारे (कोल्हापूर), भरत दौंडकर (पुणे),अरुण पवार (बीड), विष्णू थोरे (नाशिक), रमजान मुल्ला (सांगली), आबा पाटील (बेळगाव), लता ऐवळे (सांगली), बाबा परीट (कोल्हापूर), सुरेश मोहिते (सांगली), गोविंद पाटील (कोल्हापूर), एकनाथ पाटील (सांगली), अभिजीत पाटील( सांगली), बबलू वडार (कडोली) विष्णू पावले (कोल्हापूर) या निमंत्रित कवींचे संमेलन संपन्न होईल.
एकंदरीत या संपूर्ण एकदिवशीय साहित्य संमेलनाचे स्वरूप पाहता शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू आहे.तो केंद्रबिंदू ठेवून जे पत्रकार,विचारवंत,लेखक आणि चळवळीतील कार्यकर्ते काम करताय त्यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने देखील या संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांची निवड प्रक्रिया सुरू असून कुठलेही प्रस्ताव न मागवता विचार विनिमय करून लवकरच स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार आम्ही जाहीर करणार आहोत.या संमेलनाच्या उद्घाटनाच्या सत्रात या पुरस्कारांचे देखील वितरण केले जाईल.अशी माहिती देखील या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी दिली. महाराष्ट्रातील चळवळीतील व साहित्य प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित राहावे असे आव्हान नांगरट साहित्य संमेलन व प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले आहे.