मुंबई (वृत्तसंस्था) – अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा सुरु होती. या भेटीत सचिन वाझे आणि एनआयएचा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता दुपारी चार वाजता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे कारण मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा असे सांगितले असले तरी या बैठकीत सचिन वाझे प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते.