चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – १५ दिवसात थकीत देयके न दिल्यास एस.जे.शुगरच्या मालकांवर फौजदारी गुन्हे , ईडी चौकशीसह आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करू , असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे


९ महिन्यांपासून रावळगाव येथील एस.जे.शुगर्स कारखान्याकडे थकीत ऊस पुरवठादार शेतकरी व ऊसतोड मुकादमांची देयके मिळावीत यासाठी ३० सप्टेंबर रोजी मालेगाव तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार मंगेश चव्हाण, एस जे शुगर्स रावळगावच्या संचालिका मीरा घाडीगावकर, तहसीलदार चंद्रजित राजपूत, महाराष्ट्र बँकेचे प्रतिनिधी विश्वास अहिरे, द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सह. संस्था (साखर ) किरण गुंजाळ यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राठोड, बाळासाहेब देवकर, इफको संचालक रोहन सूर्यवंशी, हरी काळे मुकादम, शांताराम भोई मुकादम, कैलास पाटील, रणजित पाटील, अशोक राजपूत, कैलास कदम आदी उपस्थित होते.

बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी कारखाना संचालक मीरा धाडीगावकर यांना शेतकऱ्यांची वस्तुस्थिती अवगत करून दिली ७ दिवसात उर्वरित सर्व देयके एफआरपी नुसार व व्याजासकट देण्यात यावी अशी मागणी केली. संचालक घाडीगावकर यांनी येत्या १५ दिवसात सर्व ऊस पुरवठादार शेतकरी व मुकादमांचे देयके अदा केली जातील असे आश्वासन दिले.
मात्र त्या आश्वासनावर आमचा विश्वास नसून आत्तापर्यंत तुम्ही किती शेतकऱ्यांचे पूर्ण देयक अदा केली आहेत, किती शेतकऱ्यांचे अर्ध देयक देणे बाकी आहेत किंवा किती शेतकऱ्यांना आपण अजून एक रुपया देखील दिलेला नाही यासंदर्भात माहिती द्या असे विचारले असता अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे मीरा घाडीगावकर व कारखाना प्रतिनिधि यांनी संतापजनक उत्तर दिले.
यावेळी संतप्त झालेल्या आमदार चव्हाण यांनी याचा अर्थ काय समजायचा..? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही कारखाना चालवायला घेतला त्यांची देयकांची आकडेवारी देखील तुमच्याकडे नाही? मग तुमच्या शब्दावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा ? रावळगाव येथील एस. जे.शुगर्स कारखान्यामार्फत चाळीसगाव तालुक्यातील अनेक ऊस पुरवठादार शेतकरी व ऊसतोड मुकादमांचे देयके थकवली गेली आहेत. ३ महिन्यांपूर्वी आपणास पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन सदर थकीत देयके देण्याची मागणी केली आपण एका महिन्याच्या आत सर्व थकीत देयके देण्याबाबत लेखी आश्वस्त केले होते. मात्र आपण दिलेला शब्द पाळला नाही. आता उसाचा दुसरा हंगाम सुरु होतोय, ९ महिने झाले तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांचा उसाच्या देयकांचा पहिला हफ्ता देखील मिळाला नाही, मुकादमांनी तर व्याजाने पैसे काढून कारखान्याला ऊस पुरवला मात्र त्यांना एक रुपया देखील अजून मिळाला नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे अंदाजे १० कोटीहुन अधिक व मुकादमांचे ७ कोटी रुपये रावळगाव एस जे शुगर्सकडे बाकी आहेत. १५ दिवसात सर्व थकीत देयके देण्याचे मान्य केले आहे. मात्र आता आम्हाला कारखाना प्रशासनावर विश्वास नसुन १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व मुकादमांचे थकीत देयके एस.जे.शुगर्स ने दिली नाहीत तर १६ ऑक्टोबररोजी कारखाना मालक भाई जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर अथवा एस.जे.शुगर्सच्या मुंबई येथील कार्यलयासमोर आम्ही हजारो शेतकरी आंदोलन करू असा इशारा आमदार चव्हाण यांनी दिला.
एस.जे.शुगर्स कारखान्याचे मूळमालक व कागदावरचे मालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू व कारखान्याने जो आर्थिक घोळ शेतकऱ्यांच्या व मुकादमांच्या थकीत देयकांच्या बाबतीत घातला आहे त्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात यावी अशी ईडी व आर्थिक गुन्हे शाखेत मी स्वतः तक्रार दाखल करेन असे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत शेतकऱ्यांना जे देयक अदा करण्यात आली त्यात डिसेंबर अखेरचे देयके कारखान्याने 2300 प्रमाणे दिलीत, जानेवारीचे देयक 2000 प्रमाणे दिलीत असा दुजाभाव केला आहे. कारखान्याला उसासाठी प्रतीटन एफआरपी 2536.62 ही बँकेने ठरवून दिली होती अशी माहिती महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली त्यानुसार 2536 रुपये व त्यावरील आतापर्यंतचे व्याज यात एक रुपया देखील शेतकऱ्यांना कमी दिलेला घेतला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.







