जळगाव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १५ सप्टेंबरपासून जिल्ह्यात “माझे कुटुंब , माझी जबाबदारी” हे अभियान सुरु होत आहे. महानगर पालिकेच्या प्रभागांमध्ये अभियानाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गटनेते, पदाधिकारी यांची बैठक घेतली मात्र, अभियानाच्या सर्वेक्षणासाठी किती निधी वापरला जाणार आहे. व त्याचे नियोजन कसे याबाबत सविस्तर माहिती आयुक्तांनी देण्याचे टाळले. तसेच अभियानात लागणाऱ्या साधनांचा आज तुटवडा असल्याचे दिसून येत आहे.
येथील महानगरपालिकेत सोमवारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”या मोहिमेच्या नियोजनासाठी गटनेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, भाजपचे सभागृह नेते ललित कोल्हे, गटनेते भगत बालाणी, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी उपस्थित होते.
“माझे कुटुंब , माझी जबाबदारी” या अभियानाच्या नियोजनाची माहिती आयुक्त कुलकर्णी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दिवसाला 50 घरे तपासणी असे लक्ष्य ठेवून कार्य करावे लागेल. त्यासाठी शहरात 151 टीम व त्यासाठी 302 कर्मचारी, स्वयंसेवक या सर्व्हेक्षणाला लागणार आहे. करोना तपासणीसाठी अँटीजन टेस्ट किट दररोज लागत आहे. आणखी किट आपण सातत्याने मागवत आहोत. ज्यांना लक्षणे आहेत अशा नागरीकांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. ज्यांना लक्षणे तीव्र आहेत अशा 50 वयाच्या वरील नागरिकांची लॅबची तपासणी करून घ्यावी लागेल असेही आयुक्तांनी सांगितले.
मोहिमेसाठी फलके, भित्तिपत्रके, हस्तपत्रके याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे. राज्यातील इतर मनपाच्या दृष्टीने जळगाव मनपाची स्थिती बरी असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येच्या 25 टक्के रुग्ण मनपा क्षेत्रातील आहे. घरी सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, अंतर राखणे, हात धुणे या सूचना पाळायच्या आहेत., असेही आयुक्तांनी सांगितले.
सर्व्हेक्षणसाठी पल्स मीटर व थर्मल गनचा मनपाला पुरवठा करून घ्यावा लागणार आहे. कारण, 151 टीमला ही सुविधा द्यावी लागणार आहे. एवढी उपलब्धता मनपाला करून देण्याचे आव्हान आहे. दरम्यान या बैठकीनंतर सामाजिक संस्थांची बैठक आयुक्तांनी घेतली. या बैठकीत मागील सर्वेक्षणप्रमाणे यंदाही “माझे कुटुंब , माझी जबाबदारी” हे अभियान प्रभाग समित्यांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने राबविण्याचे आवाहन केले. मात्र, या बैठकीत सामाजिक संस्थांच्या अभियानात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना मास्क, सॅनिटायझर देण्याविषयी काय व कसे नियोजन आहे, याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही तसेच या बैठकीत येणाऱ्या प्रतिनिधींना सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मनपाचा दिव्याखाली अंधार असा कारभार दिसून आला.