नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल पत्रकार परिषद घेत मराठा समाजाचे आरक्षण मजबूत करायचे असेल तर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे,’ अशी मागणी केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘गरज पडल्यास एक दिवसीय विशेष अधिवेशनही घेऊ,’ असे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे आज सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ‘मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत गरज पडल्यास आपण एक दिवसीय विशेष अधिवेशनही घेण्याचीही आमची तयारी आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विरोधकांना पत्र देण्यास कोणी थांबविला आहे. तसे त्यांनी पत्र द्यावे,’ असेही यावेळी पवार म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आता आपल्या हालचाली वाढवल्या असून त्यांनी राज्यपालांना पत्र देत केंद्रीय मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याने आता भाजपमध्ये आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले जातंय. यामध्ये महाविकास आघाडी सरकारला विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी पर्याय सुचवलं होता. तसेच गरज पडल्यास दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणीही केली होती.