नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर मोदी सरकारचे कट्टर समर्थक आहेत असे मानले जाते. मात्र अगदी काहीच तासांपूर्वी कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनुपम खेर यांनी केली होती. त्यांनी केवळ टीकाच नव्हे तर, स्वतःच्या प्रतिमेपेक्षा सध्या लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, असेही मोदी सरकारला तडातडा सुनावले होते. साहजिकच त्यांच्या ‘जहरी’ टीकेने सर्वांची नजर त्यांच्याकडे रोख धरून होती. पण यानंतर आज अचानक साक्षात्कार झाल्यासारखे अनुपम खेर यांनी एका कवितेतून पुरेशी सारवासारव केल्याचे दिसत आहे.
अभिनेता अनुपम खेर यांनी आज सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांदरम्यान एक ट्विटर पोस्ट केली आहे. यात त्यांनी चालवलेल्या तलवारीचे टोक पुरते बोथट झाल्याचा अंदाज येत आहे. या ट्विटर पोस्ट मध्ये अनुपम खेर यांनी सहा ओळींची एक कविता पोस्ट केली आहे. ‘गलती उन्हीं से होती है.. जो काम करते है… निकम्मों की जिंदगी तो, दुसरों की बुराई खोजने में ही खत्म हो जाती है,’ हि कविता त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पोस्ट केली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे कि, काल परवा सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांबाबत हि कविता म्हणजे स्वतःची बाजू मांडणी तर नाही ना? किंवा मग अनुपम खेर यांच्या धारदार शस्त्राची धार तर गेली नसेल.. ? . असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात या ट्विटमुळे उपस्थित होत आहेत.
अभिनेता अनुपम खेर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारवर तोंडसुख घेतले होते. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. यासाठी सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात सरकारला पुरेसे यश लाभलेले नाही. यामुळे संबंधित बाबींवर सरकारवर होणारी टीका रास्त आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल, रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी परफड, कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने देशातील वातावरण दूषित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी केंद्रावर ताशेरे ओढले होते.
केवळ असंवेदनशील व्यक्तीच अशा घटनांनी हेलावणार नाही. कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून देणे ही घटना भीषण आहे. मात्र, इतर राजकीय पक्षांनी या घटनेचा राजकीय स्वाथार्साठी वापर करणे हेदेखील अयोग्य आहे. सध्या इमेज नाही तर लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असे वक्तव्य अनुपम खेर यांनी केले होते.