डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा
पदवीप्रदान समारंभ उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) – वैद्यकीय सेवा देताना सर्वोत्तम राहा. केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर चांगले माणूस म्हणून समाजात जा. रुग्णाचे मन जिंकले तरच तुमच्या पदवीची आणि वैद्यकीय सेवेची पत आहे. रुग्णांना आपत्कालीन सेवा हवी असेल तर त्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी केले.
येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ रविवार दि. १४ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर बोलत होते. प्रसंगी मंचावर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्वीकर, डॉ. माया आर्वीकर, डॉ. नागेंद्र, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून देवी धन्वंतरी आणि सरस्वती यांच्या मूर्तीला माल्यार्पण केले. यानंतर अधिष्ठाता डॉ. आर्वीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यशवी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट्स नाही. टाकीचे घाव सोशल्याशिवाय देवपण येत नाही. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा देताना निस्वार्थीपणे द्यावी असे त्यांनी सांगितले. यानंतर डॉ. बी. जी. शेखर यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी घेतल्याचे अनुभव घेतले.
केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर चांगले माणूस म्हणून समाजात जा. व्यवसायिकीकरण महत्वाचे आहे. काहीतरी वेगळे करून् दाखवा. तुम्ही पैशाच्या नव्हे पैसा तुमच्या मांगे लागला पाहिजे. माणसे कमावली पाहिजे. तुम्ही वेळेवर रुग्णावर उपचार करतात, तेव्हा डॉक्टर त्यांना देवासारखे असतात. आपातकालीन काळात डॉक्टरांची सेवा महत्वाची आहे. दुसऱ्याला आदर द्यायला शिका, असे सांगून, रुग्णाला मानसिक आधार देणेही महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांनी पदवी प्रदान करून त्यांना भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. प्रसंगी गोदावरी वासुदेव पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.