भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील गोकुळ नगरातील किराणा व्यावसायीक कैलास रमेश इंगळे (३८) हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरांनी ३२ हजारांची रोकड लांबवली.
पूजा कॉम्प्लेक्स मागील गोकुळनगर परीसरात किराणा व्यावसायीक कैलास रमेश इंगळे (३८) हे वास्तव्यास आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे इंगळे कुटूंब रावेर तालुक्यातील तासखेडा येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले. त्याची संधी साधून चोरांनी ११ ते १३ मे दरम्यान मध्यरात्री इंगळे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातून ३२ हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार शनिवारी दुपारी शेजार्यांच्या निदर्शनास आला. घराचे कुलूप तुटलेले दिसताच त्यांनी इंगळे यांना माहिती दिली. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गजानन पडघन यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात कैलास रमेश इंगळे यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास जमादार सुनील जोशी करीत आहेत.