एररंडोल ( प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एरंडोल शहरातील 15 महिला मंडळांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून देशासाठी सीमेवर लढणार्या, प्रसंगी वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांच्या परिवारास (पत्नी, आई) मायेची ऊब देवून यथोचित सत्कार समारंभ दि. 12 मार्च रोजी नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध गुणदर्शन, बक्षिस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
एरंडोलच्या शासकीय विश्राम गृहाजवळील चौधरी हॉलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर तहसिलदार सुचीता चव्हाण, शकुंतला अहिरराव, शोभना साळी, डॉ. उज्वला राठी, जयश्री पाटील, प्रा. उज्वला देशपांडे, डॉ. गायत्री पाटील, चंद्रकला जैन यांची उपस्थिती होती.
कार्यक़्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन, वंदन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. एरंडोल शहरातील आणि परिसरातील सीमेवर लढणार्या, शहीद झालेल्या जवानांच्या 26 कुटूंबीयांना शाल, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी परिवारास मायेची ऊब मिळाल्याची आणि जगण्यासाठी हिंमत प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया उमटली.
महिला दिननिमित्ताने आयोजित महिला मॅरेथॉन (5 कि. मी.) मध्ये यशस्वी झालेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, ट्रॉफी (स्मृतीचिन्ह) आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात नवविवाहीता, शिक्षिका, समाजसेविका, गृहिणींचा मोठा सहभाग होता. प्रत्येक महिला मंडळाने देशभक्तीपर गीत, समुहगीत, एकपात्री भूमिका (मी सावित्रीबाई फुले बोलतेय), समाजातील विविध वेषभूषा, चालिरिती सादर करून विशेष रंगत आणली. शिस्तबध्द, उत्कृष्ट सादरीकरणामुळे महिला भारावून गेल्या.
यशस्वीतेसाठी राजमाता जिजाऊ महिला मंडळ, साळी समाज महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, मानसी महिला मंडळ, शारदोपसक महिला मंडळ, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, गुजर समाज महिला मंडळ, रेणूका महिला मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल महिला मंडळ, सर्वधर्म समभाव महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले. यावेळी निलिमा मानुधने यांना वनविभागाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. गायत्री पाटील यांचाही पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महिला दिनाचे महत्व जयश्री पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचलन क्षमा साळी, स्वाती काबरा, मनिषा पाटील, संध्या महाजन यांनी केले तर आभारप्रदर्शन अंजुषा विसपुते यांनी केले. सुनिता डहाके यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. राजस्थानी महिला मंडळ सदस्यांनी स्वागतगीत सादर करून सर्वांचे स्वागत केले. कार्यक़्रमासाठी महिला मंडळ सदस्या, पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. जळगांव जिल्ह्यात एरंडोललाच सर्व महिला मंडळ एकत्र येवून कार्यक्रम सादर करतात हे विशेष.