मुंबई (वृत्तसंस्था) – राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर आता विरोधकांकडून आरोप होऊ लागल्यामुळे 6 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घेतलेला निर्णय उपमुख्यमंत्री पवारांनी मागे घेतला आहे. मात्र निर्णय मागे घेऊन देखील विरोधकांकडून आरोप सुरूच असून आता भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, कोणावर मेरबानी केली अजित पवारांनी? टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना… काय तर म्हणे एक पाऊल मागे. पवार कुटुंब फक्त जनतेच्या पैशावरच आयुष्य जगतंय. मुंबई मधलं यशवंतराव चव्हाण सेंटर स्वतःचं असल्यासारखं पवार कुटुंब वापरतात. पवार कुटुंबाने जनतेच्या पैशावरच वाटेल तशी मजा केली.
राज्यात कोरोना महामारी मुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर आता विरोधकांकडून आरोप होऊ लागल्यामुळे 6 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घेतलेला निर्णय उपमुख्यमंत्री पवारांनी मागे घेतला आहे. त्यांनी नुकतेच आदेश संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.
याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल असून उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवारांकडे असलेल्या उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क या खात्यांबाबतचे निर्णय, आदेश आदींची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त केली जाणार होती. या कंपनीला या कामासाठी 6 कोटींचा निधी दिला जाणार होता. ही कंपनी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम आदी सांभाळणार आहे.