दिल्ली (वृत्तसंस्था) – बॉलिवूड जगतातील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानला कोण ओळखत नाही? आमिर खानला परफेक्शनिस्ट व्यतिरिक्त मार्केटिंगमधील जीनियससुद्धा म्हटले जाते. तो आपल्या चित्रपटांच्या मार्केटींग कॅम्पेनमध्ये स्वतःहून सहभाग घेताना दिसतो. त्याच्या जबरदस्त आयडिया आणि कॅम्पेनमूळे त्याचे चित्रपट खूप यश मिळविण्यात नेहमीच यशस्वी होताना दिसतात.आमिर चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन येत असतो. त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीचा त्याचा एक व्हिडीओ सध्या भन्नाट वायरल होतोय. या व्हिडिओत तो स्वतःच्या सिनेमाचे पोस्टर रिक्षाच्या मागे लावताना दिसत आहे.
अभिनेता आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा आमिर चित्रपटाचे उत्तमरित्या प्रमोशन करताना दिसायचा. याच दरम्यानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात आमिर चित्रपटाचे पोस्टर्स वेगवेगळ्या ऑटो-रिक्षांमध्ये चिटकवताना दिसतो आहे. या व्हिडिओमध्ये तरुणपणीचा आमिर खान निळ्या रंगाच्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये अनेक पोस्टर्स हातात घेऊन रिक्षामागे चिकटवताना दिसतोय. त्याच्यासोबत मित्र आणि सह-अभिनेता राज जुत्शी देखील या व्हिडिओत दिसतो आहे. दोघे ऑटो रिक्षा थांबवतात आणि ड्रायव्हरला विचारतात की, त्यांच्या सिनेमाचे पोस्टर रिक्षाच्या मागे लावू शकतो का? आणि मग पोस्टर चिकटवतात.
आमिरने ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तो अभिनेत्री जूही चावला सोबत दिसला होता. हा चित्रपट अत्यंत लोकप्रय झाला होता. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, आमिर म्हणतो, ‘ जुत्शी, मी, मंसूर आणि त्याची बहीण नुजहात, आम्ही रस्त्यावर निघायचो टॅक्सी आणि ऑटो थांबवायचो. आम्ही त्यांना सांगायचो की, हे पोस्टर चिकटवा आमच्या आगामी सिनेमाचे आहे. काही लोक तयार व्हायचे तर काही नकार द्यायचे. लोक विचारायचे हा कोणता सिनेमा आहे?, यात कोण आहे?, आमिर खान कोण आहे? मग मी सांगायचो मी आमिर खान आहे. आम्ही खूप प्रयत्न करायचो की लोकांना आमच्या सिनेमाविषयी माहिती देऊ शकू.