दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत राज्यानेही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे . मात्र सध्या लसीचा तुटवडा जाणवतो आहे त्यामुळे लसीकरण केंद्रांवर ती गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण रद्द केले असून 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस पूर्ण करण्याचे काम चालू आहे. पण या सर्वांमध्ये दिव्यांग व्यक्तींना कोणताही वेगळी व्यवस्था देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण प्राधान्याने देण्यात यावे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्राद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, ‘राज्यात सर्वत्र कोरोना रोगावरील लसीकरण करण्याची मोहीम सुरू आहे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण केंद्रांवर रांगा लावून आहेत सदर लसीकरणासाठी दिव्यांग नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या लसीकरण केंद्रावर उपस्थित असतात. त्यामुळे बराच वेळ रांगेत उभं राहणं गरजेचं असतं दिव्यांगांना जास्त वेळ रांगेत थांबणं शक्य नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ देण्यासाठी राज्यात सर्वत्र सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. तरी राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी तातडीने योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणा व जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात यावेत. अशी मागणी पत्राद्वारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.