कालबाह्य BWSC पाईप वापरल्याने शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाई व दुरुस्तीचा भार

पिलखोड (वृत्तसंस्था) – चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ला पिलखोड, बिलाखेड व हॉटेल संगम जवळ मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पाईपलाईन दुरुस्तीची कामे नगरपालिकातर्फे युद्धपातळीवर रात्रंदिवस सुरू असून काल दि.११ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांनी पिलखोड जवळील पाईपलाईन दुरुस्ती कामाला भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील व नगरसेवक नितीन पाटील, नगरपालिका अभियंता संजय अहिरे व कर्मचारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना देखील त्यावेळी BWSC सारख्या कालबाह्य पाईप प्रणाली यांचा वापर पाईपलाईनसाठी करण्यात आल्याने वारंवार पाईपलाईन गळती होऊन शहरवासीयांना पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी नगरपालिका अभियंता यांच्याशी केलेल्या चर्चेत निष्पन्न झाले. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती चा मोठा भार नगरपालिका पर्यायाने चाळीसगाव शहरवासीयांवर पडत आहे.








