कोल्हापूर (वृत्तसंस्था ) – कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकर्यांचे कत्तलखाने असल्याची घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली असून केंद्राने केलेल्या कायद्यांचे समर्थन केले आहे.

कोल्हापूरात बोलतांना सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकर्यांना शेतीमाल खरेदी विक्रीसाठी मार्केट कमिट्या स्थापन झाल्या. मात्र, मार्केट कमिट्या शेतकर्यांची मंदिरे नसून कत्तलखाने झाले आहेत. शेतकर्यांची अडते, मार्केट कमिटीच्या जोखडातून मुक्तता व्हावी, त्यांना स्वातंत्र्य मिळावे यासाठीच केंद्र सरकारने कृषी कायदे मंजूर केले आहेत, असे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी केले.
सदाभाऊ पुढे म्हणाले की, केंद्र सरकारनं मंजूर केलेले कायदे शेतकर्यांच्या जीवनात क्रांती आणणारे आहेत. हे कायदे शेतकर्यांच्या हिताचे असून गेली सत्तर वर्ष भांडवलशाही व्यवस्थेत खितपत पडलेल्या शेतकर्यांच्या बाजूचे आहेत. या विधेयकामुळे शेतकर्यांना हमीभाव मिळण्याबरोबरच शेतीमाल साठवणूकीच्या बंधनातून मुक्तता होणार आहे.
दरम्यान, राजकीय स्वार्थापोटी काही पक्षांकडून शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यातूनच या कायद्यांना लागलेली दृष्ट, वाईट भावना दूर व्हाव्यात, अशी आमची भावना आहे. यासाठी सोमवार १४ डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात रयत क्रांती संघटनेच्यावतीने कृषी कायद्यांना अभिषेक घालण्यात येणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.







