चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) – शेतात काम करत असलेल्या महिलेला अचानक कुत्र्याच्या मागे धावत असलेला बिबट्या दिसला. बिबट्या तिच्या दिशेने येत होता. अशावेळी दुसऱ्या बाजूला नदी आणि एका बाजूला बिबट्या अशा स्थितीमध्ये तिने प्रसंगावधान दाखवत चक्क तापी नदीमध्ये उडी घेतली. काळाने चारही बाजूने घेरलेले असताना महिलेचा जीव मात्र वाचला,हे विशेष… ही घटना चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे घडली आहे.
लताबाई दिलीप बाविस्कर असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे शेत तापी नदीच्या काठावर असून शनिवारी १० सप्टेंबर रोजी ती दुपारी १२ वाजेच्या सुमारास उळीद , मुगांच्या शेंगा तोडण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी दुपारी चार वाजेनंतर एक कुत्रा वेगाने धावत तिच्या दिशेने येत होता. लताबाईने त्याकडे पाहिले, तर एक बिबट्या देखील त्या कुत्र्याच्या मागे होता. हे दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला. एका बाजूला हिंस्त्र प्राणी बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला तापी नदी होती.
क्षणाचा विलंब न करता बिबट्यापासून वाचण्यासाठी महिलेने तापी नदीत उडी मारली. महिलेला पोहता येत असल्याने ती पोहायला लागली. तसेच एका केळीच्या खोडाला तिने धरून ठेवले. तिला दम लागत होता. मात्र लताबाईने धीर सोडला नाही. काही तासानंतर पाडळसरे धरण आल्यावर तिला पुन्हा पाण्याचा त्रास होऊ लागला. धरणाच्या सळईमध्ये साडी अडकून फाटली. मात्र श्वास रोखून धरल्याने ती खोल पाण्यातून पटकन वर आली.
त्यानंतर रात्रीच्या अंधारात चंद्रप्रकाशात पुढे नदीच्या काठावर होडी लागलेल्या दिसल्या. लताबाईंनी परत हिम्मत अंगात आणली आणि होड्यांच्या जवळ पोहोचली. त्यावेळेस तिला उलट्या झाल्या. किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता नावाडी आल्यानंतर त्याने आजूबाजूला विचारपूस सुरू केली.
नावाड्याला लताबाईंनी रुमाल आणि साडी मागितली. त्यानंतर गावातले लोक तिथे आले. तिला कळाले की, आपण अमळनेर तालुक्यातील निम गावात आलो आहोत. तिथे सांगितले की, माझा भाचा येथेच राहतो. त्यानुसार तिच्या भाच्याने देखील तिला ओळखले. त्यानंतर लताबाईंना तिच्या कुटुंबीयांच्या घरी पोहोचवण्यात आल.
हा सर्व थरार पाहता गावकऱ्यांनी देखील महिलेच्या धाडसाचे कौतुक केले. दरम्यान, जिल्हाभरातील शेतामध्ये बिबट्या दिसून येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मागणी होत आहे.