महिला, बालकल्याण विभागातर्फे कार्यशाळेत मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) – बालकांवरील शोषण थांबविण्यासाठी त्यांना चांगला व वाईट स्पर्श कसा ओळखावा याचे प्रशिक्षण,शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने दिले पाहिजे तसेच बालकांचे शोषण हे जवळच्या नातेवाईकांकडून होत असल्याच्या घटना घडत असल्याने सर्व नागरिकांनी जागरूक राहून घटनांवर प्रतिबंध करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
बाल सुरक्षा सप्ताह व दत्तक सप्ताह १४ ते २१ नोव्हेंबर तर, अनाथ प्रमाणपत्र पंधरवडा १४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राबविण्याबाबत जळगावात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे कार्यशाळा गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती तळेले, सदस्य अँड. प्रदीप पाटील, बाल न्याय मंड्ळाचे सदस्य डॉ. नीरज देव, अर्चना भदादे उपस्थित होते. डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, बालकांच्या कायद्याविषयी पोलीस विभागातील अधिकारांना माहिती असणे आवश्यक आहे. बाल संरक्षणाचे काम करणाऱ्या प्रत्येकाने संवेदनशील पणे भूमिका बजावली पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यशाळेत दत्तक प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच बालकांच्या सुरक्षाविषयी समस्यांबाबत माहिती देण्यात आली. या पंधरवड्यात जिल्ह्यातील अनुदानित व विना अनुदानित संस्थांमधील प्रवेशित बालकांना अनाथ प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहेत. तसेच बेटी बचाव बेटी पढाव अभियान आणि वन स्टॉप सेंटरची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केली. दत्तक प्रक्रियेबाबत न्यायालयीन प्रक्रिया व बालकांचे स्वरक्षण व उपाय या विषयी अँड. प्रदीप पाटील, डॉ. नीरज देव यांनी मार्गदर्शन केली. सूत्रसंचालन बाल सुधार गृहाच्या अधीक्षक जयश्री पाटील यांनी तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी एस.आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, यशश्री पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी, सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.