जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरणगाव येथील प्रभारी प्राचार्य डॉ. डी.एल.पाटील यांच्या नियुक्तीस कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्थगिती दिली आहे.
याबाबतचे पत्र ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेला विद्यापीठाने दिली आहेत. याबाबत जयवंत भोईटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, निलेश भोईटे यांनी वरणगाव महाविद्यालयात डॉ. डी.एल.पाटील यांना बेकायदीशीरपणे प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती दिली होती. या नियुक्तीला विद्यापीठाने देखील मंजुरी दिली होती. त्यामुळे जयवंत भोईटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अँड. कुणाल पवार यांनी हरकत घेतली होती. याबाबत विद्यापीठाने ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवलेली होती. यात निलेश भोईटे हे संस्थेच्या परिशिष्ट – १ वर नसतांना बेकायदेशीरपणे डॉ. डी.एल.पाटील यांची वरणगाव महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती केल्याचे पुराव्यासह म्हणणे सादर केले होते. त्यावर बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाने योग्य निर्णय देऊन डॉ. डी.एल.पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.