नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नुकत्याच पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पद्दुचेरी इथं झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसच्या कामगिरीवर काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यातील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी, विन्सेंट पाला आणि ज्योती मनी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. पाच राज्यांना भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांची उमेदवारांची व राज्याच्या नेतृत्वाची चर्चा करून ही समिती एक अहवाल तयार करेल आणि तो काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर सादर करेल. या समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी देऊन सोनिया गांधी यांनी विश्वास दाखवला आहे.
दरम्यान काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा झाली. त्यात पश्चिम बंगालचे निवडणूक प्रभारी जितीन प्रसाद यांनी आयएसएफसी केलेल्या आघाडीला पराभवासाठी जबाबदार ठरवलं. आसाम मध्ये एआययुडीएफ शी केलेल्या आघाडीबाबत ही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष म्हणाल्या की आपण एक समिती तयार करून ती पराभवाच्या प्रत्येक पैलूवर विचार करेल. केरळ आणि आसाम मध्ये का पराभव झाला की आपण शोधून काढला पाहिजे पश्चिम बंगालमध्ये आपल्या हातात एकही जागा आली नाही या गोष्टी त्रासदायक असल्या तरीही त्यांचा सामना करून त्याबाबत विचार करायला हवा याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला यातून धडा घेता येणार नाही असं त्या म्हणाल्या आहेत.