नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. 16 मेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पण आता येत्या एक-दोन दिवसात समुद्रातील हवेची दिशा बदलून हे वादळ ओमानकडे सरकेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आणि गोव्याच्या किनारपट्यांना या चक्रीवादळाचा धोका असेल, अशी माहिती देण्यात आली होती. पण आता तुर्तास राज्यावरील चक्रीवादळाचा धोका टळला आहे. मात्र, राज्यात येत्या पाच दिवसांत विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया याठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे.
कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी 14 ते 16 मे दरम्यान तीन दिवसांत अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. त्याचबरोबर 16 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना मुंबई वेधशाळेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 16 मे रोजी या दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस सुरु असताना घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत न येण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्र, कोमोरीन, मालद्विव आणि लक्षद्विप याठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत. याच परिसरात 16 मे रोजी चक्रीवादळ निर्माण होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.