नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लसीकरणावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
तसेच ज्या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु होते. ते 45 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या लसींमधूनच होत होते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी खोट्यावर खोटं बोलण्याचे हे दररोजचे काम आता बंद करून देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण कसे होईल या करिता काम करावे असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
आमदार भातखळकर म्हणाले की, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची असून, या वयोगटातील नागरिकांकरिता राज्य सरकारने स्वतः लसींची खरेदी करून लसीकरण करायचे आहे, असे असताना सुद्धा स्वतः लस खरेदीची प्रक्रिया न राबवता केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. केंद्राने जाहीर केलेल्या लसीकरण धोरणानुसार देशात उत्पादन होणाऱ्या 50 टक्के लसी राज्य सरकार थेट कंपन्यांकडून विकत घेऊ शकते.
परंतु ठाकरे सरकारने अद्याप खरेदी प्रक्रिया राबविली नाही. रिलायन्स, फोर्टीस, वेलनेस यांसारख्या खाजगी हॉस्पिटल्सनी याच काळात लाखो लसीं विकत घेऊन लसीकरण सुरू केले. अशा प्रकराची तत्परता दाखवत राज्य सरकार सुद्धा विकत घेऊ शकले असते, पण बेजबाबदार ठाकरे सरकारने ते का केले नाही? राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने लस खरेदीची प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीचा शासन निर्णय 7 मे रोजी काढला. 12 कोटी डोसची गरज असताना या शासन निर्णयात केवळ 7.79 लाख डोसच विकत घेण्यास का मान्यता दिली असा सवालही भातखळकरांनी उपस्थित केला आहे.