नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आजम खान यांची प्रकृती बिघडली आहे. पुढील 72 तास त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे मेदांता रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी सांगितले. तसेच जर या काळात प्रकृतीत सुधारणा झाली तर ठीक राहील, असेही ते म्हणाले.
डॉ. राकेश कपूर यांनी सांगितले, की आजम खान आणि त्यांच्या मुलाला 9 मेला सीतापूर कारागृहातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉ. कपूर यांनी व्हिडिओ जारी करत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘आजम खान जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांना प्रत्येक तासाला 4 ते 5 लिटर ऑक्सिजनची गरज होती. त्यांच्या डाव्या लेटरल लंग्समध्ये कोविड निमोनियाचे निदान झाले. दोन दिवसांनी त्यांचा आजार वाढला तेव्हा त्यांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यानंतर त्यांना कोविड वार्डच्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले’.
दरम्यान, आजम खान यांना सध्या ऑक्सिजनची गरज कमी प्रमाणात भासत आहे. ते जेवत आहेत आणि स्टेबल आहेत. मात्र, संभाव्य धोका पाहता त्यांच्यावर कोविड प्रोटोकॉलनुसार उपचार केले जात आहेत. येत्या 72 तास त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर ठीक होईल. मेदांता येथील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे, अशी माहिती डॉ. राकेश कपूर यांनी दिली.