मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तथा क्रीडामंत्री गिरीश महाजन हे दि. १८ ते २६ मे या कालावधीत जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहे. यासाठी शिंदे सरकारने त्याच्या दौऱ्याला नुकतीच परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे १७ मे रोजी त्यांचा वाढदिवस झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ते परदेश दौऱ्यावर जाणार आहे.
राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य शासनाने फुटबॉल क्लब बायर्न,, म्युनिच, जर्मनी या संस्थेसोबत करार केला आहे. या संस्थेने क्रीडा संकुल व्यवस्थापन, क्रीडा विज्ञान, पायाभूत सुविधा यांचा अभ्यास व्हावा यासाठी क्रीडामंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले आहे. तसेच, लॉसने, स्वित्झर्लंड येथील क्रीडा विज्ञान व तंत्रज्ञानाची आंतरराष्ट्रीय अकादमीचे कार्यकारी संचालक डॉ. क्लाऊडे स्ट्रीकर यांनी मुंबई येथे क्रीडामंत्री यांची भेट घेतली होती. भेटीत मल्लखांब व योग केंद्र स्वित्झर्लंड येथे स्थापन करण्याची तसेच, राज्याच्या क्रीडा क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी विनंती केली आहे. याकरिता क्रीडामंत्री गिरीश महाजन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
त्यामुळे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात दि. १८ ते २६ मे या कालावधीत जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभ्यास दौऱ्यात क्रीडा व्यवस्थापन, संकुलाविषयी बाबी, क्रीडा रणनीतीत क्रीडा विज्ञान व क्रीडा औषधांचा समावेश, युवा आणि तळागातील क्रीडा विकास धोरण, मल्लखांब व योग केंद्राची उभारणी, प्रचार, प्रसार, अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण पद्धती, क्रीडा तंत्रज्ञानाचा घेण्यात येणार लाभ आदींचा समावेश आहे.
क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचे समवेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव सुनील हंजे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे हे दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचे शासकीय क्रीडा मार्गदर्शक धीरज मिश्रा यांनाही जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहे.