कोलकाता ( वृत्तसंस्था ) – चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला यश मिळाले तरी या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार असून ती कोणत्याही राज्यापुरती नसेल, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपने सत्ता राखली आहे. पंजाबमध्ये मात्र आपने काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचत मोठे बहुमत मिळविले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, भाजपला चार राज्यांत जे यश मिळाले आहे, ते आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय असेल, याचा स्पष्ट संकेत आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये २०१७ मध्ये भाजपला जे यश मिळाले होते, त्यामुळेच २०१९ मध्ये या पक्षाला लोकसभा निवडणुकीत बाजी मारता आल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, देशासाठीची लढाई ही २०२४ मध्ये लढली जाईल, तेव्हाच तिचा निकाल समजू शकेल. कोणत्याही राज्यातील निकालावरील त्याचा अंदाज बांधता येणार नाही, हे साहेबांनाही माहीत आहे. राज्यातील निकालांवरून विरोधकांवर मानसिक दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. याला कोणी बळी पडू नये.