मुंबई ( वृत्तसंस्था ) – जळगाव येथील तेजस मोरेने भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेर्यातून स्टींग झाल्याचा आरोप विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी केला व्हिडीओ मॉर्फ करून बदलल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आता जळगावचे कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गौप्यस्फोट करत सव्वाशे तासांचे स्टींग ऑपरेशन सादर करून खळबळ उडवून दिली होती. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा वार्तालाप दर्शविला होता. प्रवीण चव्हाण यांनी तात्काळ आपल्यांवरील आरोप खारीज केले होते. यानंतर प्रवीण चव्हाण यांनी हे स्टींग नेमके कसे झाले याची माहिती दिली.
प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्या पुणे येथील कार्यालयात तेजस मोरेने घड्याळ भेट दिले होते. हे घड्याळ कार्यालयात लावले होते. यातील छुप्या कॅमेर्यातून स्टींग करण्यात आले. मात्र यात आपण कुणाचेही नाव घेतलेलेच नाही. हे व्हिडीओज एडीट करण्यात आलेले आहे. माझ्या तोंडी नसणारी वाक्ये टाकण्यात आलेली आहेत. माझ्या चित्रीकरणात नसलेला आवाज टाकला आहे. हे व्हिडीओ पूर्णपणे एडिट करून तयार करण्यात आले आहेत. हे घड्याळ आपल्याला भेट म्हणून देणारा तेजस मोरे जळगाव येथील असल्याची माहिती प्रवीण चव्हाण यांनी दिली. सखोल चौकशीतून सत्य समोर येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तेजस मोरे जामीनाच्या संदर्भात आपल्याकडे आला होता. तेजस मोरे याच्या सोबत चाचू नावाचा व्यक्ती होता अशी माहिती देखील त्यांनी दिली. प्रवीण चव्हाण यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.