कोलकाता (वृत्तसंस्था) – भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या मुकूल रॉय यांनी आता केंद्र सरकारला त्यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा परत घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात मुकूल रॉय यांनी केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था परत घ्यावी, असे म्हटले आहे. मुकूल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ही सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, अमित शाह यांच्या अखत्यारित असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप या पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही.
मुकूल रॉय यांनी चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर मुकूल रॉय आणि त्यांचे पूत्र शुभ्रांशु रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली . मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुकूल रॉय यांची तृणमूल काँग्रेसमधील घरवापसी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुकूल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली. यावेळी ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मुकूल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर टीएमसीतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं