पुणे (वृत्तसंस्था) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे, असं विनायक मेटे यांनी सांगितलं.
विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. 5 मे रोजी कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. पण एक महिना उलटला तरी सरकारने अजून फेरविचार याचिका दाखल केली नाही. यापेक्षा निष्क्रियपणा दुसरा कोणता असू शकतो. आम्ही 5 तारखेपासून सांगतोय ते ऐकलं जात नाही. माजी न्यायामूर्ती भोसले यांच्या समितीने सांगितलेलं ऐकायचं नाही. याचाच अर्थ सरकारला मराठा आरक्षणाचं देणंघेणं राहिलेलं नाही. केवळ दिल्लीला जाऊन ठाकरे-चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढलं आहे. दिल्ली भेटीत मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावायला होता. राज्यात मराठा समाजाचा रोष वाढल्यामुळे दिल्ली भेट झाली. काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी ही भेट होती. प्रत्यक्षात मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, असं मेटे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आणि मोर्चे काढण्यात येणार आहे. हे मेळावे मूक असणार नाहीत. तर बोलके असतील. न्याय मागणारे असतील. संघर्ष करणारे असतील, असं सांगतानाच भोसले कमिटीप्रमाणेच आम्ही कायदे तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत. समाजाच्यावतीने ही समिती नेमली जाईल. येत्या आठ दिवसात या समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असं सांगतानाच येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटारसायकलची रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.