सांगली (वृत्तसंस्था) – संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ते शनिवारी इस्लामपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाविषयीच्या भूमिकेवर बोट ठेवले. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. मात्र, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात. या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता संभाजीराजे यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.