मुंबई (वृत्तसंस्था) – उत्तरप्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल योगीजी करोत अथवा ना करोत तोही त्यांचा अधिकार आहे. मात्र यावेळी जनतेने बदल करण्याचा विचार पक्का केला आहे असे नवाब मलिक यांनी म्हटले.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं मलिक यांनी सांगितलं.