श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात आज सकाळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या टीमवर हल्ला केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं.
काश्मीरच्या उत्तरेकडील सोपोर येथील आरामपोरा परिसरात अतिरेक्यांनी हा हल्ला केला. अतिरेक्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या टीमला लक्ष्य केलं होतं. त्यामुळे पोलिस आणि जवानांनीही अतिरेक्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून तीन नागरिक ठार झाले आहेत. अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर या अतिरेक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
या आधी शोपियां जिल्ह्यात शुक्रवारी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या टीमवर हल्ला केला होता. दक्षिण काश्मीरच्या जैनपोरा परिसरातील अगलरमध्ये हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आणि जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घालून अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, हे अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
या आधी मार्चमध्येही अतिरेक्यांनी सोपोर येथे पोलिस आणि जवानांवर हल्ला केला होता. 29 मार्च रोजी सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन फरिदा खान यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकाला गंभीर मार लागला होता. तर एका पोलीस अधिकारी या हल्ल्यात शहीद झाला होता. त्याआधीही नाथीपोरामध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती.