नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. निवडणुकांची तारीख जाहीर होण्यापूर्वीच अमित शाहंपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वच नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि भाजप थेट आमनेसामने आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच, खरे तर असदुद्दीन ओवेसी बंगालमध्ये येत नाहीत, तर त्यांना भाजपच येथे घेऊन येत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी सातत्याने करत आहेत. आता याला भाजप नेते अमित शाह यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.
याच मुद्द्यावर एका वृत्त संस्थेशी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. देशाच्या संविधानात प्रत्येक राजकीय पक्षाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. मग मते देणे अथवा न देणे हा जनतेचा अधिकार आहे.’
अमित शाह यांनी बंगालच्या निवडणुकीत 200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी युती संदर्भातील एका प्रश्नावर शाह म्हणाले, ‘सर्वच पक्ष स्वतत्र आहेत. त्यांना आपली युती कुणासोबत करायची, निवडणूक कशी लढायची, हे बघायचे आहे. आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.’
पश्चिम बंगालमध्ये भाजप ममतांना थेट टक्क देत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि डावे एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्ताधारी टीएमसीचा खरा सामना भाजप आणि काँग्रेस-डाव्या आघाडीशी आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात. यासाठी सर्वच पक्ष सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल.