मुंबई (वृत्तसंथा) – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रताप सरनाईक यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. यानुसार प्रताप सरनाईक आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या चौकशीस सुरुवात झाली आहे.

‘टॉप ग्रुप’ कडून मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात ‘एमएमआरडीए’च्या विविध प्रकल्पांसाठी 2014-15 या काळात सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात आणि या कंपनीला दिल्या गेलेल्या पेमेंटंमध्ये असलेल्या कथित आर्थिक अनियमिततांबाबत ‘ईडी’कडून चौकशी केली जात आहे. यासाठी ईडीने प्रताप सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालयात ईडीने छापे घालून शोधाशोध केली होती. तसंच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही करण्यात आली होती.
प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र, पदेशातून आल्याने सरनाईक विलगीकरणात होते. आज ते ईडीसमोर हजर झाले. दरम्यान, ‘टॉप ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक एम शशिधरन यांना सोमवारी रात्री मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली स्थानबद्ध करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी आज संगितले. याप्रकरणी ‘ईडी’ने पूर्वी सरनाईक यांचे साथीदार अमित चंडोल यांना अटक केली आहे.







