भडगाव (प्रतिनिधी) – माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सन २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपरिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र – शिल्प व खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी १० डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर नामनिर्देशन मागविण्यात आले होते.
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी झाले. या सर्व कलाप्रकारांमध्ये वैयक्तिक सहभाग होता. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांने आपल्या कलेचा ४ ते ६ मिनीटांचा व्हिडीओ तयार करून हा व्हिडिओ व कला सादर करत असतांनाचे ५ फोटो इ फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब व ट्विटर वर हॅशटॅग वापरुन पाठविण्यात आले. व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जिल्हास्तरावर परिक्षण समितीमार्फत व्हिडिओची तपासणी करून प्रत्येक जिल्ह्यातुन ९ कलाप्रकारांमध्ये १ विद्यार्थी व १ विद्यार्थीनी अशा १८ सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची नावे निश्चित करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आली.
सदर कला उत्सवात जिल्ह्यातील एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी मध्ये कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित ला वि मंदिर व दादासाहेब सुमा पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथील सौम्य रविंद्र सुर्यवंशी या विद्यार्थ्यांची द्विमितीय चित्रासाठी निवड करण्यात आली. व पुढील कला उत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्हयामार्फत औरंगाबाद येथे नामनिर्देशन करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्यांस विद्यालयाचे कला शिक्षक आय एन भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरि पाटील व संचालक दादासाहेब प्रशांत पाटील आणि डॉ. सौ. पुनम ताई पाटील व विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील मॅडम, उपप्राचार्य ए एम पाटील सर आणि पर्यवेक्षक ए एस पाटील सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.