भुसावळ (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याधिकारीविना असणार्या येथील नगरपालिकेला आता संदीप चिद्रवार यांच्या रूपाने सीओ मिळाले आहेत. ते लवकरच आपल्या पदाची सूत्रे घेतली अशी अपेक्षा आहे.

येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली असून ते उद्या कार्यभार सांभाळणार आहेत. येथील मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना मे महिन्यात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. यानंतर येथे प्रभारी मुख्याधिकारी होते. करूणा डहाळे या लवकरच कर्तव्यावर रूजू होतील अशी चर्चा सुरू झाली होती. तथापि, ७ जुलै रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दिवशी याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले होते. ते सध्या कामठी येथे कार्यरत आहेत. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
तथापि, रमाकांत डाके यांनी भुसावळच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे घेतलीच नाही. याबाबत मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. हे सारे होत असतांना भुसावळ नगरपालिकेचा कारभार हा प्रभारी मुख्याधिकार्यांकडे असल्याने शहरातील अनेक कामे खोळंबली होती. विशेष करून ऐन कोरोनाच्या आपत्तीमध्ये नगरपालिकेत प्रभारीराज असल्यामुळे अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमिवर, आज संदीप चिद्रवार यांची आज मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून नगरविकास खात्यातर्फे याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
संदीप चिद्रवार हे लवकरच भुसावळच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे सांभाळणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळच्या विकासकामांना गती येईल अशी अपेक्षा आहे. चिद्रवार हे नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून आता ते भुसावळची धुरा सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.







