जळगाव (प्रतिनिधी) – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी विनाअनुदानित स्वयं अर्थ सहायित शाळांमध्ये राखीव असलेल्या प्रवेश वर्गाच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के जागांकरिता दिनांक ५ एप्रिल रोजी प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया पार पडलेली होती. यानंतर आज दि. १२ रोजी दुपारी ३ वाजेनंतर आरटीई पोर्टलवर जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागा करिता २९८३ बालकांची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज जाण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यातील सर्व पालक प्रस्तुत वेबसाईट पहात असल्यामुळे ओव्हरलोड होण्याची शक्यता आहे. करिता मेसेजची वाट न पाहता आरटीई पोर्टल वरील “अर्जाची सद्यस्थिती”या टॅबवर पालकांना आपल्या मुलाच्या अर्जाची सद्यस्थिती कळू शकेल. निवड झालेल्या बालकांनी आपले कागदपत्र पडताळणी करिता गटसाधन केंद्र पंचायत समिती येथे तालुकास्तर समितीकडे आपली फाईल तीन प्रतीत दिनांक १३ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान सादर करून आपल्या बालकाचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जळगाव यांनी केलेले आहे.