जळगाव (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी रुग्णालयात काम करताना रुग्णांचा विश्वास जिंकला पाहिजे. उत्तम संवादी वातावरण ठेऊन चांगली रुग्णसेवा देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. रुग्णालयात काम करताना रोजच्या कामाचे व्यवस्थापन करावे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे मंगळवारी ११ एप्रिल रोजी शपथ समारंभ झाला. महाविद्यालयात २०१८ साली प्रवेशित पहिल्याच १०० विद्यार्थ्यांच्या बॅचची नुकतीच परीक्षा होऊन निकाल लागला. आता या विद्यार्थ्यांना एक वर्ष आंतरवासिता प्रशिक्षण घेणे बंधनकारक असल्याने रुग्णालयात पुढील वर्षभर ते सेवा देणार आहे. त्यांना चरक संहितेनुसार शपथ देण्याचा कार्यक्रम अधिष्ठाता यांचे उपस्थितीत पार पडला. प्रसंगी मंचावर उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, डॉ. अरुण कसोटे उपस्थित होते.
प्रस्तावनेतून डॉ. योगिता बावस्कर यांनी, पहिल्या बॅचचा अनुभव सांगितला. तसेच, जबाबदारी आणि शिस्तबद्ध कामकाज करून नियमांचे पालन करीत रुग्णालयात सेवा द्यावी लागेल असे सांगितले. यानंतर प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे अर्चना पंजाबी, अंजली केंचलवार, साक्षी राणे यांचा अधिष्ठातांनी सन्मान केला. त्यानंतर विविध गुणवंत विद्यार्थी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या वतीने, अर्चना पंजाबी, देवस्मिता गोस्वामी, श्रीकांत यांनी मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयात अनुभव चांगला राहिला. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले. संवादी व्यक्तिमत्वाचे प्राध्यापक लाभले. कला, क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखविता आले. वैद्यकीय शिक्षणात प्रात्यक्षिकांद्वारे कौशल्यपूर्ण शिकता आले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णसेवेसाठी चरक शपथ अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी दिली.
आंतरवासिता प्रशिक्षण घेत असतानाही ग्रंथालयात जाऊन वाचनाची सवय कायम ठेवा. वरिष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्या. खिलाडूवृत्ती ठेवून एकमेकांना सहकार्य करीत आयुष्यात प्रगती करावी, असे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
सूत्रसंचालन व आभार डॉ. विलास मालकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. सुनयना कुमठेकर, डॉ. दीपक वाणी, डॉ. चिराग रामनानी, राजेंद्र वैद्य, गजानन गुसिंगे, राकेश पिंपरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार
आंतरवासिता प्रशिक्षणसाठी आता ९८ डॉक्टर रुग्णालयाला प्राप्त होणार आहे. अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध विभागात नियुक्त्या लावल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे.