जळगाव महापालिका निवडणूक

सकाळच्या संथ सुरुवातीनंतर मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान
जळगाव प्रतिनिधी
बहुप्रतीक्षित जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांत जळगावकरांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसून आला नव्हता, मात्र १० वाजेनंतर मतदानाचा वेग वाढण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरात सरासरी १३.३९ टक्के मतदान झाले आहे.
सकाळच्या सत्रात ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत केवळ ५.५ टक्के मतदान झाले होते. त्या काळात केवळ २४,१४८ मतदारांनी केंद्रावर हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन तासांत मतदारांचा ओघ वाढला असून ११.३० वाजेपर्यंत एकूण ५८,६९८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये ३३,२५७ पुरुष आणि २५,४४१ महिला मतदारांचा समावेश आहे. कडाक्याची थंडी आणि घरगुती कामांमुळे सुरुवातीला महिलांची संख्या कमी होती, परंतु आता महिला मतदारही मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत.
शहरातील काही संवेदनशील केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू आहे. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या मोठ्या तक्रारी अद्याप कुठेही समोर आलेल्या नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यात निरुत्साह असला तरी, दुपारच्या सत्रात तरुण आणि नोकरीनिमित्त बाहेर जाणारे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का दुपारी आणखी वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
प्रशासनातर्फे ‘आधी मतदान, मग काम’ असे आवाहन करण्यात येत असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.









