शिक्षक दाम्पत्याचा पारोळ्यात स्तुत्य उपक्रम

पारोळा(प्रतिनिधी)- शहराचे रहिवासी व धाबे जि. प. शाळेचे राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी गाई व इतर मुक्या जीवांना रोज अन्नाचे दोन घास मिळावे म्हणुन शहरात कचरा व्यवस्थापन करणाऱ्या नगर परिषदेच्या घंटा गाडींना ” गाय रोटी ” म्हणुन अन्न गोळा करण्याच्या बकेट लावली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
शहरात रोज विविध भागात नगरपालीकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडी फिरतात . नागरिक त्यात ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा टाकतात . त्या बरोबर घरात उरलेले अन्न पदार्थही टाकुन देतात किंवा कॅरी बॅगेत पॅक करून बाहेर फेकतात. कचरा गाडीत टाकलेले अन्न एकतर वाया जाते व कॅरी बॅगेत फेकलेले अन्न पदार्थ गाई कॅरी बॅगसह गिळतात . त्यामुळे त्यांना इजा पोहचते. तरी नागरिकांनी आता अन्न पदार्थ घंटा गाडीला लावलेल्या बकेट मध्ये स्वतंत्र टाकावे व मुक्या जीवांसाठी, गाईंसाठी एक रोटी तरी दान द्यावी म्हणजे या मुक्या जीवांना दोन अन्नाचे घास मिळतील, त्यासाठीच आज साळुंखे दाम्पत्याने ” गाय रोटी ” हा सुंदर उपक्रम सुरु केला आहे.
यावेळी नगर परिषदेचे घन कचरा व्यवस्थापन ठेकेदार महाविर शोभाचंद भंडारी , प्रसाद गोकुळ महाजन यांच्यासह घंटा गाडी चालक अधिकार विश्वनाथ पाटील, रामकृष्ण चुडामण पाटील हे उपस्थित होते. प्रसंगी घंटागाडी चालकांनी याबाबत मनापासुन सहकार्य देण्याचे आश्वासन दिले .







