मृत महिलेच्या कानातील सोने गायब प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील महिलेचा जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात महिलेच्या कानातील रिंग अक्षरशः ओढून घेण्यात आल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनात आले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने समिती नेमली असून प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
फर्दापूर येथील रवींद्र माणिक देवकर यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणी वाकोद-पहूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी मृत शरीराची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, इंदुबाई माणिक देवकर या कोविड रुग्णालायात न्युमोनिया झाला, म्हणून वॊर्ड क्रमांक २ मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी संद्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर सीलबंद केलेला मृतदेह ताब्यात आल्यानंतर लक्षात आले की, इंदूबाईंच्या कानातील सोन्याची १० ग्रामची रिंग गायब झाली आहे. तरी या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सदस्य अमित देशमुख म्हणाले की, मृतदेहावरील सोने गहाळ होणे हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी असे ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याप्रकरणी रुग्णालयाने तातडीने दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार आणि प्रभारी मेट्रन निला जोशी यांची चौकशी समिती नेमली आहे. आता समितीचे काम सुरु झाले असून दोन सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यात काही सापडले नाही मात्र, आणखी इतर फुटेज आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे असेही ते म्हणाले.