चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव पालिकेच्या सभेत एकूण १४ विषय चर्चेसाठी व्यासपीठासमोर ठेवण्यात आले. यात शहरातील हायमस्ट लॅम्प, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन, शहरातील चौकांचे सुशोभीकरण या विषयावर वादळी चर्चा झाली.
येथील पालिका कामगारांच्या किमान वेतनासह शहराच्या विविध समस्यांवर चाळीसगाव पालिकेची सभा चांगलीच गाजली. लॉकडाउननंतर पालिकेत पहिली सर्वसाधारण सभा झाली. यामुळे या सर्व प्रसंगी सफाई कर्मचाऱ्यांनी थेट पालिका गाठून ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करत वेतनवाढीसाठी पालिका प्रशासनाला निवेदन दिले.
कर्मचाऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा असून, यावर लवकरच पगारवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली. सभेत लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख, भाजपचे गटनेते संजय पाटील, नगरसेवक बंटी ठाकूर, दीपक पाटील, रवींद्र चौधरी, नितीन पाटील, राजेंद्र चौधरी, अण्णा कोळी, शेखर देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला.
चाळीसगाव पालिकेत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढविण्याबाबत अनेकदा लेखी व तोंडी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आंदोलन करण्यात आले असता किमान वेतनवाढीचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु आश्वासन हवेत विरले. त्यामुळे कामगारांची फसवणूक झाली आहे. यामुळे कामगारांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा पगार किमान वेतनाप्रमाणे अदा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी पालिकेत धडक देत जोरदार घोषणाबाजी केली.